फुणगूस येथील मुख्य मार्गावर दोन महिन्यात सहावा अपघात

गेल्या दोन महिन्यात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विशेषतः या भागात एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक रहिवाशी वर्गात व वाहन चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी संध्याकाळी गणपतीपुळे येथून मुंबई येथे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा याच ठिकाणी अपघात घडला आहे. मात्र सुदैव म्हणावे लागेल कोणालाही यात इजा झालेली नाही.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्रीपुल आंबेड येथून डिंगणी -फुणगूस पुलावरून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.  या मार्गांवरचा वाहचालक सर्रासपणे वापर करताना दिसतात. फुणगूस -जाकादेवी या मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील तीव्र आणि अवघड चढ -उताराच्या वळणावर गेल्या दोन महिन्यात सहा अपघाताच्या घटना घडल्या. या मार्गांवरून येताना वाहने थेट वीस ते तीस फूट खोल दरीत गेल्या मात्र काही अपघातांची भीषणता व थरकाप उडवणारी दृश्य पाहता अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी काही वाहनांचे तसेच वाहतूक करण्यात येणाऱ्या सामानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

फुणगूस ते जाकादेवी हा मार्ग तीव्र चढ -उतार आणि अवघड वळणाचा मार्ग आहे. अनेकदा वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहना वरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत असल्याचे बोलले जात असून चढ -उतार, वळण आदी ठिकाणी सूचना फलक, साईड गर्डर चा अभाव अपघाताला कारण ठरत असून यापूर्वी तसेच सातत्याने होणारे अपघात पाहता या ठिकाणी गर्डर, सूचना फलक लावण्याची मागणी करूनही सबंधित विभाग डोळेझाक करत आहे. मात्र याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

या एकाच ठिकाणी अपघात घडत असल्याने स्थानिक जनतेसह वाहनचालकात चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले असून या वृत्ता मुळे अनेक वाहनचालकांनी अपघाताचे संकट ओढवून घेण्यापेक्षा निवळी मार्गे गणपतीपुळे तसेच त्या मार्गांवर जाण्यासाठी लांबचे अंतर पडवडेल पण हा मार्ग नको म्हणून पाठ फिरवण्यास सुरु केली आहे.