सावधान! गोरं दिसण्यासाठी क्रिम लावताय?…किडनी होईल डॅमेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर चेहरा उजळ व त्वचा तजेलदार दिसण्यासाठी तुम्ही एखादं क्रिम वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या क्रिमच्या वापरामुळे तुमचा चेहरा जरी उजळ दिसत असला तरी तुमची किडनी मात्र निकामी होत आहे. कारण अशा प्रकारच्या क्रिममध्ये सर्रासपणे मेटल मर्क्युरीचा वापर केला जातो. जो किडनीसाठी घातक असून या क्रिमच्या सततच्या वापरामुळे भविष्यात किडनी डॅमेज होण्याची शक्यता संभवते. असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारच्या क्रिममध्ये आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचा वापर होतो. हे माहित असूनही अशा क्रिमची विक्री जगभरात सर्रासपणे होत आहे. असा दावा झीरो मर्क्युरी वर्किंग ग्रुपने केला आहे. हा ग्रुप मर्क्युरीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर जनजागृतीचे काम करतो. याअंतर्गत नुकतेच 12 देशांमध्ये यावर संशोधन करण्यात आले. यात वेगवेगळ्या कंपनींच्या 158 स्किन क्रिमच्या नमुन्यांपैकी 96 क्रिममध्ये मेटल मर्क्युरीचे प्रमाण 40 पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियनपासून 1 लाख 30 हजार पीपीएम पर्यंत असल्याचे आढळले. यात हिंदुस्थानमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्रिममध्ये मर्क्युरीचे प्रमाण 48 ते 1 लाख 13 हजार पीपीएम पर्यंत असल्याचे टीमच्या निदर्शनास आले. एका मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील बहुतेक क्रिमची निर्मिती आशियाई देशांमध्ये करण्यात येत आहे. त्यात पाकिस्तान, थायलँड आणि चीन या देशांचा समावेश आहे.