
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान या लग्नाबाबत तसेच स्मृती व पलाशच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या दरम्यान स्मृतीने देखील लग्नाच्या सर्व पोस्ट डिलीट केल्याचे देखील बोलले जात आहे. अशातच आता स्मृतीची खास मैत्रिण राधा यादव हिने देखील पलाशला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.
राधा यादव ही स्मृतीची टीम इंडियाच्या संघातली खास मैत्रीण आहे. राधा स्मृतीच्या लग्नासाठी सांगलीला देखील गेली होती. तिच्या लग्नात तिने जेमिमा रॉड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील यांच्यासोबत डान्सही केला होता. राधा, जेमिमा आणि श्रेयंका या सर्व जणी पलाशला सोशल मीडियावर फॉलो करत होत्या. मात्र लग्न पुढे ढकलल्यानंतर राधाने पलाशला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं असल्याचे समजते.
स्मृती मानधना हिचे आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. पण ऐन मुहूर्ताच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि लग्न पुढे ढकलण्यात आले. याचवेळी पलाशही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले.
त्या दिवशी काय घडलं?
स्मृती-पलाश यांचा विवाह रविवारी त्यांच्या मूळ गावी सांगलीत होणार होता. हळद, मेहेंदी, संगीतचा कार्यक्रम जोरात झाला होता. टीम इंडियाच्या विश्वविजेत्या खेळाडूही या सोहळ्याला उपस्थित होत्या. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे स्मृती-पालशचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

























































