बीडमध्ये हृदयद्रावक घटना, एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश; दोन चिमुकलींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या साखरे कुटुंबियांवर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील आईसह दोन चिमुकलींना झोपेत सर्पदंश झाला. या दुर्घटनेत दोन चिमुकलींचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर आहे. त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे घडली.

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील दीपक साखरे यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास झोपेतच कुटुंबातील तिघांना सापाने दंश केला. त्यात दीपक साखरे यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. स्वप्नाली दीपक साखरे ( वय 4), स्विटी दीपक साखरे ( वय 3) यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. तर जयश्री दीपक साखरे ( वय 30) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश झाल्याने दोन चिमुकलींची जीव गेला आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.