काजवा महोत्सवावरून ‘सोशल मिडीया वॉर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सचिन गोरे

जगात रशिया-युक्रेन युद्धाची चर्चा जोरात सुरू असताना महाराष्ट्रात मात्र वेगळेच वॉर सुरू झाले आहे. काजवा महोत्सवावरून सोशल मीडियावर दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काजव्यांचे रक्षण करण्यासाठी असे महोत्सव भरवू नयेत, असे पर्यावरणप्रेमी गटाचे म्हणणे आहे. तर, काजव्यांच्या प्रजननकाळाला बाधा न आणता स्थानिकांच्या रोजगारासाठी महोत्सव भरविण्याची मागणी दुसऱ्या गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, वन विभागाने विविध उपाययोजना करून १५ मे पासून काजवा महोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून भंडारदरा परिसर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात काजवा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. कोरोनाकाळात मात्र स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, सध्या कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळे वन विभागासह स्थानिक ग्रामस्थांकडून ‘काजवा महोत्सवा’चे आयोजन नव्या जोमाने करण्यात येत आहे.

साधारण मे महिन्याच्या अखेरीस काजव्यांनी बहुतांश पश्चिम घाट उजळून निघतो. हा काळ त्यांच्या समागमाचा आणि प्रजननाचा महत्त्वपूर्ण असतो. निसर्गचक्रात या सोहळ्याचे आपण शब्दांत वर्णन करू शकत नाही. परिणामी मागील काही वर्षांत अमाप जत्थे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी डोंगरदऱ्यात भटकू लागले आहेत. हातात टॉर्च, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, गोंगाट, स्पीकरवर गाणी आणि गर्दीमुळे काजवा प्रजाती धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे वन विभागाकडून अनेक निर्बंध लागू करू न ‘काजवा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे.

भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील स्थानिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने पर्यटनावरच अवलंबून आहे. वनविभागाकडून दरवर्षी ‘काजवा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी यंदा वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावण्यात आल्याची महिती हरिश्चंद्रगड, कळसुबाई अभयारण्य क्षेत्राचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली. अभयारण्य क्षेत्रात वाहने सोडताना कुठलीही गाडी रस्त्यावर थांबणार नाही, यासाठी वन विभागाने मुरशेत, उडदावणे, पांजरे, ठाणघर अशा दहा ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. येथे वाहने पार्क करून पर्यटकांना पायी सोडण्यात येते. शिवाय वन विभागाकडून सात ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून, प्रत्येक नाक्यावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आल्याचे सहायक वनसंरक्षक रणदिवे म्हणाले.

नियमांचे उल्लंघन केल्यास पाच हजारांचा दंड

व्हिडीओ शूटिंग, टॉर्च, हायलाइट्स, डीजे, उच्च प्रतीचे कॅमेरे, मोबाईलच्या फ्लॅशलाइट्स यांनाही बंदी करण्यात आली आहे. या क्षेत्रात प्लॅस्टिकला बंदी घालण्यात आली असून, मद्यप्राशन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. सध्या वन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे स्थानिक वन समित्यांना आठ ते दहा माणसे देण्यास सांगितले आहे. यासह पोलीस विभाग, होमगार्ड्सची मदत घेण्यात येत आहे. ‘काजवा महोत्सवा’दरम्यान अभयारण्य क्षेत्र परिसरात ट्रेकिंगला बंदी घालण्यात आल्याचेही सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

काजव्यांचा नैसर्गिक अधिवास हा पाणवठ्यांवर आणि काळोखावर अवलंबून असतो. अशी परिस्थिती असेल तरच त्यांचे प्रजनन होते. मात्र, पर्यटक हेडलाईट्स चालू करून अभयारण्य क्षेत्रात वाहने उभी करतात. काही अतिउत्साही पर्यटक तर थेट पाणवठ्यांपर्यंत वाहने घेऊन जातात. त्यामुळे ठरावीक संख्येने पर्यटक सोडून ठराविक ठिकाणावरून त्यांना काजवे दाखवावेत, अशी सूचना मी वन विभागाला केली होती. आम्ही पर्यटकांसाठी काही ठिकाणी निरीक्षण पॉइंट उभारले होते. पर्यटकांनी तेथे उभे राहून काजव्यांचे निरीक्षण करावे, आपल्यासोबतचा कचरा या पॉइंटवर ठेवलेल्या कुड्यांमध्येच टाकावा, अशा सूचना आम्ही पर्यटकांना दिल्या होत्या. मात्र, पर्यटक तेथे न थांबता वाटेल तिथे जातात, तिथेच जेवण करतात आणि अस्वच्छता पसरवतात. त्यामुळे वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशा उपाययोजना करायला हव्यात.

– प्राचार्य डॉ. मोहन वामन,
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय.

काही पर्यटक हुल्लडबाजी करतात. मात्र, वन विभागाने मोठ्या प्रमाणावर बंधने घातली आहेत. गेली दोन वर्षे काजवा महोत्सव होऊ शकला नाही. मात्र, यंदा तो होत आहे. गावकरी म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी बॅनर्स लावणे, टोलनाक्यांवर माहितीची पत्रके वाटणे अशा गोष्टी करत असतो. बरेच पर्यटक नियमांचे पालन करतात. मात्र, काही अतिउत्साही पर्यटकांमुळे सर्वांनाच त्रास होतो.

– दिलीप भांगरे, सरपंच, शेंडी.