
प्रतिबंधित फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी 132 जणांवर गुन्हे दाखल करीत 21 लाख रुपयांचे फटाके जप्त केले आहेत. फटाके विक्रीची दुकाने तपासणीसाठी 30 पथके तैनात करण्यात आली आहेत.
दिवाळीनिमित्त शहरात सध्या विविध ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठ्या आवाजाचे, प्रदूषणकारी व प्रतिबंधित करण्यात आलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करणाऱ्य़ा स्टॉल्सची तपासणी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 30 पथके तयार केली आहेत. या पथकांनी शहरातील 133 कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपातील फटाके विक्रीसाठी दिलेल्या परवानाधारक स्टॉल्सची तपासणी केली. या स्टॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित फटाके आढळले. पोलिसांनी 21 लाख 34 हजार 655 रुपयांचे फटाके जप्त केले असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये 132 आरोपींच्या विरोधात 23 गुन्हे दाखल केले आहेत.



























































