
सोलापूर जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अपिल अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. यामुळे भाजपच्या उमेदवार माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयाने नामंजूर केला होता. त्याविरोधात त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर तीन दिवस सुनावणी सुरू होती. आज न्यायालयाने थिटे यांचे अपिल फेटाळले.
अनगर (ता. मोहोळ) नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात राजकीय लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सही नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱयांनी अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे थिटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर तीन दिवस सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी थिटे यांचा अर्ज फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱयांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आले आहे. थिटे यांच्याबरोबर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा औपचारिक ठरली आहे. थिटे यांच्याकडून ऍड. दत्तात्रय घोडके, तर सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.
दरम्यान, अनगर नगरपंचायत निवडणुकीत यापूर्वीच 17 नगरसेवक बिनविरोध झाल्याने गेल्या 70 वर्षांतील बिनविरोध निवडीची परंपरा यंदाही कायम राखण्यात आल्याचे सांगण्यात येते.



























































