सोलापूर शहरात पहिल्या दिवशी 75 टक्के शाळा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात मंगळवारपासून शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील 75 टक्के शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या असून, उर्वरित शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 20 दिवसांपासून शाळा बंद होत्या. काही दिवसांपासून रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे व पालकांच्या मागणीमुळे शहरातील बालवर्ग ते 12 वीपर्यंतचे वर्ग मंगळवारपासून सुरू करण्यास पालिकेचे आयुक्त शिवशंकर यांनी परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहरातील 384 शाळांपैकी 288 शाळा सुरू झाल्या. काही पालकांना वेळेत शाळा सुरू झाल्याबाबतची माहिती न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पाठवू शकले नाहीत व काही तांत्रिक कारणामुळे मंगळवारी काही शाळा सुरू झाल्या नाहीत, परंतु बुधवारपासून शहरातील सर्वच शाळा सुरू राहणार आहेत. मंगळवारी सकाळी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करत वर्गात प्रवेश दिला व अध्यापन कार्य सुरू केले. शहरातील 3361 शिक्षकांपैकी 3122 शिक्षक उपस्थित होते. 49 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, परंतु त्यांच्यात कोरोनाची तीव्र लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी शहरात जवळपास 30 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील शाळांचा आठ दिवसांत निर्णय

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असून, येत्या आठ दिवसांत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामीणमधील रुग्णसंख्या दीडशेपेक्षा कमी झाल्यानंतर पहिली ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सध्या ऑनलाइन व ऑफलाइन तासाद्वारे अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.