
सोलापूरात प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील लांबोटी शिवारातील रॉयल इन या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री घडली आहे. धनंजय बाळू गायकवाड (रा. लोणीकंद, जि. पुणे) व अश्विनी बिराप्पा पुजारी (रा. निराळे वस्ती, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.
धनंजय व अश्विनी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही विवाहित असल्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. दरम्यान, सोमवारी (दि. 27) हे दोघे सोलापूरकडे निघाले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी लांबोटी गावच्या शिवारातील अर्जुन सोंड पाटीजवळील रॉयल इन या लॉजवर मुक्काम केला. रात्री 10 वाजता त्यांनी लॉजमधील मालकाला जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी वेटरला पाठवून द्या, असे सांगितले होते. त्यानुसार रात्री पावणेअकरा वाजता वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांच्या रुमबाहेर येऊन बेल वाजवली. मात्र, दरवाजा आतून बंद होता. तर, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने त्याने खिडकीतून आत पाहिले असता, दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसले.
यासंदर्भात लॉजमालकाने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, धनंजयने ओढणीने, तर अश्विनीने दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयातील पाठवून दिले. याप्रकरणी दिनेश गाडे यांनी दिलेल्या माहितीवरून मोहोळ पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. सहायक फौजदार युसूफ शेख तपास करीत आहेत.





























































