आषाढी वारीत ड्रोन छायाचित्रणाला बंदी, सोलापूर जिल्हा प्रशासनाचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी यात्राकाळात यंदा 12 ते 14 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून, गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केला आहे.

30 जून ते 13 जुलै या आषाढी वारी कालावधीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून लाखो वारकरी येतात. 9 जुलै 2022 रोजी सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात. या काळात नदीघाटावर, मंदिर परिसरात, पालखीमार्गावर टीव्ही चॅनेल्स, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे.

वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते. छायाचित्रण केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून 30 जून ते 13 जुलै या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घातली आहे.