सोलापूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! अक्कलकोट, पंढरपूरसह सहा तालुक्यांत एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार 251 कुटुंबाचा आधार हिरावणारा ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आता पुन्हा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात सध्या 14 सक्रिय रुग्ण असून, त्यांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सोलापूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

गेल्या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे कोरोना संशयितांचे टेस्टिंगदेखील दररोज सरासरी 100 पर्यंतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

गर्दीच्या ठिकाणी शक्यतो विशेषतः पूर्वीचा गंभीर आजार असलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला असावा. सर्दी, खोकला असलेल्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी. वेळेत उपचार झाल्यास संभाव्य धोका टाळता येतो. सर्वांनीच कोरोनापूर्व खबरदारी घेतल्यास धोका कमी होतो. कोरोना प्रतिबंधित लसीचे डोसदेखील टोचून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्याधिकाऱयांचे मत आहे.

बार्शीत सर्वाधिक चार रुग्ण

दुसरीकडे बार्शी तालुक्यात सर्वाधिक चार रुग्ण असून, तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही. करमाळा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी दोन, तर मोहोळ तालुक्यात एक रुग्ण आहे. या तीनही तालुक्यांतील शहरी भागात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण सद्यःस्थितीत नाही. सध्या ग्रामीणमधील आठ पुरुष व एक महिला तर शहरातील तीन पुरुष व दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आहेत.