सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहर व ग्रामीण भागामध्ये एकूण 114 केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी आलेली लस पूर्णपणे संपलेली असून, मागील दोन दिवसांत 12 हजार 485 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 17 हजार 662 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख 87 हजार 84 जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर त्यांपैकी एक लाख 47 हजार 64 जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. कोरोना झाल्यानंतर दोन्ही डोस घेणारा रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्सिजनविना बरा होतो, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यात विशेषतः 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्णांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठांचा आणि आता 18 ते 44 वयोगटातील तरुणांचाही समावेश आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत 30 हजारांहून अधिक लसीकरण झाले आहे. शहरातील 28, तर ग्रामीणमधील 86 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, लस शिल्लक राहत नसल्याने या केंद्रांवरील लसीकरणात सातत्य राहत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून सात लाख 34 हजार 148 जणांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी बार्शी तालुक्यात सर्वाधिक 26.50 टक्के लसीकरण झाले आहे, तर मोहोळ व सांगोला तालुक्यांत अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वांत कमी लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याचा अनुभव येऊ लागला आहे. मोहोळ तालुक्यातील एक लाख 98 हजार 119 जणांचे, तर सांगोल्यात दोन लाख 30 हजार 977 जणांचे लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. त्यांपैकी मोहोळ तालुक्यातील 17.36 टक्के, तर सांगोल्यात 15.73 टक्केच लसीकरण झाले आहे. लसीकरणाबद्दल अजूनही संभ्रम कायम असल्याचे चित्र या तालुक्यांमध्ये दिसत आहे.

जिल्ह्यासाठी तीन हजार डोस मिळाले आहेत. ही संपूर्ण लस माढा तालुक्यात दुसऱया डोससाठी वापरली जाणार आहे. माढा तालुक्यातूनच लस आणायला वाहन पाठविण्यात आले होते. दुसऱया डोसची मुदत संपलेल्यांची संख्या या तालुक्यांत सर्वाधिक होती. दुसरीकडे शहर-ग्रामीणमध्ये अवघे दीड हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे संपूर्ण केंद्रे लसीअभावी बंद ठेवावी लागणार आहेत.