
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. रोज रात्री 10 ते पहाटे सहा या वेळेत शहरातील प्रमुख 32 रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शहरातील रस्ते, पदपथ आणि दुभाजकांची नियमित स्वच्छता करण्यात येणार आहे. या संबंधीच्या कामाचा ठेका पाच वर्षांसाठी देण्यात आला आहे. श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील परिसरात रस्ता स्वच्छ करणाऱ्या यंत्राचे उद्घाटन करण्यात आले.
रस्ते स्वच्छ करणे, पदपथ स्वच्छ करणे, पुतळे धुवून घेणे, दुभाजकांची निगा राखणे आणि दुरुस्ती करणे, कचरा उचलणे आदी कामांचा ठेका देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते रोड स्वीपिंग मशीनचे उद्घाटन झाले. यावेळी उपायुक्त धनराज पांडे, कंपनीचे हरदीप खोर, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक एन. सी. बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक अन्वर शेख, आय. टी. बिराजदार, स्वप्नील सोलनकर, गिरीश तंबाके, तेजस शहा यांची उपस्थिती होती.
शहरातील 120 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दररोज स्वच्छता केली जाणार आहे. यानंतर एक दिवसआड काही रस्त्यांच्या स्वच्छतेचे नियोजन करण्यात येणार आहे. या रस्त्यांची लांबी 41 किलोमीटर आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत यंत्राच्या मदतीने स्वच्छता करण्यात येईल. या कामाचा ठेका लायन सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला दिला आहे. या कंपनीला प्रतिकिलोमीटर स्वच्छतेसाठी 1150 रुपये देण्यात येणार आहेत. हा ठेका पाच वर्षांसाठी आहे.
शहरातील रस्ते स्वच्छ होतील. स्वच्छतेची कामे रात्री होत असल्यामुळे सकाळी सोलापूरकरांना प्रसन्न वातावरण दिसेल. धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी व्हायला मदत होइल. दमा असलेल्या रुग्णांना धुळीचा त्रास होणार नाही. यंत्राने शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. ज्या रस्त्यांची कामे अर्धवट आहेत ती कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे सौंदर्य खुलेल. शहरातील पदपथ रोजच्या रोज स्वच्छ होतील. दुभाजकही स्वच्छ दिसतील. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण झाले, आता अंमलबजावणी होईल.
सकाळी उद्घाटन, दुपारीच बिघडले मशीन
रोड स्कीपिंग मशीनचे थाटात उद्घाटन झाले. मात्र, दुपारी एका मशीनमध्ये ऑइल गळती झाली. त्यामुळे ती मशीन सात रस्ता बस डेपोबाहेर दिवसभर उभी होती. दोन मशीन मात्र बस डेपोत उभारले होते. मशीनची ऑइल गळती झाल्यामुळे एक मशीन बाहेर उभी असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे यांना विचारले असता, त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे म्हणाले.
रस्त्यांवरील माती आणि कचरा, चौकातील स्वच्छता, पदपथ स्वच्छ होणार आहेत. याच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महापालिकेचे यांच्यावर नियंत्रण असणार आहे. तसेच, जीआयएस सिस्टीमही आहे. याद्वारे चांगले काम होईल.
– पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर मनपा.
या प्रकल्पाद्वारे शहरातील धुळीचे प्रमाण कमी होईल. तसेच इतर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते आणखी सुंदर दिसतील. रस्ते, पदपथ, रस्ता दुभाजक स्वच्छ होतील. यापुढे शहर स्वच्छ आणि हिरवे राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न असतील.
– धनराज पांडे, उपायुक्त, सोलापूर मनपा.
























































