
सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळत असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत फक्त 15 कोटी जमा झाले आहेत. महापालिकेची सर्व मदार शासन अनुदानावर चालू आहे. उत्पन्नवाढीचे नवे मार्ग नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळकतकरांची वसुली ठप्प असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महापालिकेचे उत्पन्न कमी झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक दिवाळखोरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवसुली बंद होती. एक महिना झाले मिळकतकराची ऑनलाइन आणि ऑफलाइन वसुली चालू झाली आहे. सर्वांत जास्त उत्पन्न मिळवून देणारा मालमत्ताकर विभाग आहे. यासाठी स्वतंत्र उपायुक्त दर्जाचा अधिकारी असतानाही वसुलीचे प्रमाण ठप्प आहे. कोटय़वधीची थकबाकी असलेल्या मिळकतदारांना वाऱयावर सोडून नियमित कर भरणाऱयांना नाहक त्रास दिला जात आहे. ऑनलाइन टॅक्स भरण्याचा प्रणालीचा सावळा गोंधळ चालू आहे. ऑनलाइन टॅक्स भरल्यानंतर पालिकेच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. मात्र, मिळकतदारांच्या खात्यामधून तत्काळ पैसे जातात यांची विचारणा करण्यासाठी महापालिकेच्या टॅक्स विभागात हेलपाटे मारवे लागतात असा गोंधळ टॅक्स विभागामध्ये चालू आहे.
एप्रिल ते जुलैअखेर महापालिकेच्या 23 विभागांचे मिळून फक्त 15 कोटी 24 लाख 74 हजार 969 रुपये जमा झाले आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात 2 कोटी 75 लाख 91 हजार, जुलैमध्ये 2 कोटी 92 लाख 13 हजार 582, तर जून महिन्यामध्ये 3 कोटी 49 लाख 77 हजार 345 रुपये जमा झाले आहेत, तर जुलै महिन्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील बिलाचे वाटप झाल्याने मिळकतदारांनी प्रतिसाद दिल्याने तब्बल तीन कोटींनी उत्पन्न वाढले आहे. जुलै महिन्यात 6 कोटी 6 लाख 92 हजार 716 रुपये जमा झाले आहेत.


























































