समांतर जलवाहिनी 170 एमएलडीची, वाढत्या विस्तारामुळे वाढीव ‘डीपीआर’च्या कामाला गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन समांतर जलवाहिनी 110 एमएलडीवरून 170 एमएलडी क्षमतेची करण्यात यावी, अशी मागणी आयुक्त पी. शिवशंकर यांनी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठीच्या बैठकीत केली होती. या बैठकीतील निर्णयानुसार 170 एमएलडीचा वाढीव ‘डीपीआर’ महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून तयार करण्याच्या कामाला गती आली आहे.

सोलापूर शहरासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सोलापूर-उजनी या जलवाहिनीवरून प्रत्यक्षात शहरासाठी 65 एमएलडी पाणी उपलब्ध होते. टाकळी-सोरेगाव येथून 65 एमएलडी पाणी शहरासाठी उपलब्ध होते; परंतु या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या असल्याने एकूण उपसा होणाऱ्या पाण्यापैकी 40 टक्के पाण्याची गळती होते. यावरील देखभाल-दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. सोलापूर शहराची पुढील 35 वर्षांची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सुरू असलेली जलवाहिनी ही 110 एमएलडीवरून 170 एमएलडी क्षमतेची टाकण्यात यावी. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहराला आजमितीला दररोज 180 एमएलडी पाण्याची गरज आहे. ती भविष्यात 250वर जाण्याची शक्यता आहे.

याचा विचारविनिमय होण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाचे मंत्री, अधिकारी, महापालिका प्रशासन, पदाधिकारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत समांतर जलवाहिनी 110वरून 170 एमएलडी करणे, टाकळी-सोरेगाव या जलवाहिनीला पर्याय म्हणून एकरूख सिंचन योजनेतून हिप्परगा तलावाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी वाढीव 220 कोटींची पाणीपुरवठा योजना राबविणे यावर चर्चा झाली. रखडलेली योजना लवकर सुरू करण्याची मागणी केली. पाणीपुरवठय़ासंदर्भातील दोन्ही प्रस्तावांचा सुधारित आराखडा शासनाकडे त्वरित सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली होती.

बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने 170 एमएलडीचा वाढीव विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या वाढीव समांतर जलवाहिनी योजनेचा प्रस्ताव स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

सोलापूर-उजनी या 110 एमएलडीच्या पूर्वीच्या विकास आराखडय़ात बदल करावा लागणार आहे. 170 एमएलडी क्षमतेचा विकास आराखडा तयार होण्यास आणखी आठवडय़ाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे व स्मार्ट सिटी कंपनीकडे मंजुरीसाठी जाईल.

– उमाकांत माशाळे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

शहरवासीयांसाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून 110 एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकण्यात येत होती; परंतु दोन अधिकाऱ्यांच्या वादात ही योजना रखडली. नुकत्याच झालेल्या बैठकीत समांतर जलवाहिनीच्या विषयावर बोलले. 110करून 170 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी केली, ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु याची कार्यवाही वेळेत पूर्ण होणे महत्वाचे आहे. त्यासाठीही आमचे प्रयत्न राहतील.

– श्रीकांचना यन्नम, महापौर.