धक्कादायक; नाकाबंदीवरील पोलिसाच्या अंगावर पीकअप घालून खून

500
crime

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयपूर महामार्गावर वडकबाळ येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीतील पोलीस रामेश्वर गंगाधर परचंडे (वय 30) यांच्या अंगावर पीकअप घालून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी पीकअपचालकास अटक केली आहे. दरम्यान, रामेश्वर परचंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रामेश्वर परचंडे हे सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि नऊ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. गौस नबीलाल कुरेशी असे अटक केलेल्या पीकअपचालकाचे नाव आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आदेशानुसार पोलिसांनी वडकबाळ येथे नाकाबंदी केली आहे. 22 मे रोजी रात्री पोलीस रामेश्वर परचंडे हे पोलीसनाईक लक्ष्मण कोळेकर, होमगार्ड स्वप्नील गिरी, दिनेश रास्ते यांच्यासह डय़ुटीवर होते. पहाटे कर्नाटक हद्दीतून आलेल्या भरधाव पीकअपला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पीकअप थांबवली नाही. पीकअपची नंबर प्लेट खोडलेली असल्यामुळे पोलीस रामेश्वर परचंडे व होमगार्ड रास्ते यांनी दुचाकीवरून पीकअपचा पाठलाग केला. पोलीस येत आहेत, हे पाहून चालकाने पीकअप समशापूर ते नंदूर रस्त्याने घेतली. महामागार्पासून 200 मीटर अंतरावर पाठलाग करून परचंडे यांनी पीकअप अडविली. पीकअप थांबल्याचे पाहून परचंडे दुचाकीवरून उतरून चालकाकडे जात असताना चालकाने पीकअप वेगाने दामटली. यात पीकअपचा धक्का बसून परचंडे खाली पडले व पीकअपचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. होमगार्ड रास्ते आणि पोलीस नाईक-कोळेकर यांनी परचंडे यांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. नाईक कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीकअप चालक गौस कुरेशी याच्याविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या