सोलापूर – पुणे महामार्गावर दुचाकीला वाहनाची धडक, तीन जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर – पुणे महामार्गावर अरण गावच्या हद्दीत यशवंत कॉटेजजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. अपघात झाला त्या वेळी दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत पावला. हा अपघात गुरुवार 4 मे रोजी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावं तेजस सुरेश इंडी (20, रा. मिलन अपार्टमेंट, भवानी पेठ, सोलापूर) त्याचा मित्र लिंगराज शिवनंद हळके (24, रा. भवानी पेठ, सोलापूर) व गणेश शरणाप्पा शेरी (23, रा. भवानी पेठ, सोलापूर) अशी आहेत. या तिघांपैकी गणेश याचा सोलापर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

गुरुवारी मध्यरात्री हे तिघेही दुचाकी क्र. एमएच 13 डीझेड 9826वरून सोलापूरकडून पुण्याकडे जात असताना अरण गावच्या हद्दीतील यशवंत कॉटेजजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघाताप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात किरण सुभाष इंडी यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.