
सोलापूरकरांना आता जूननंतर सोलापूर-पुणे ‘मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (मेमू) गाडी धावणार आहे. सोलापूर रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर सोलापूर-पुणे ‘मेमू’ला पहिली गाडी धावण्यास ‘ग्रीन सिग्नल’ मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांची सोलापूरकरांची मागणी पूर्णत्वास जात आहे. दरम्यान, ‘मेमू’ रेल्वे जूननंतर सुरू करण्याच हालचाली सुरू आहेत. कोरोना महामारीमुळे विभागातील सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने जूनपर्यंत सोलापूरकरांना मेमूची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या काही महिन्यांतच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच सोलापूर-पुणे ‘मेमू’ सुरू करण्यास रेल्वेकडून हिरवा कंदील मिळणार आहे. सोलापूर विभागात ‘डेमू’ गाडय़ा सुरू आहेत. सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम पूर्ण नसल्याने कोरोना महामारीमुळे विभागातील ‘डेमू’ गाडय़ा बंद आहेत. ‘डेमू’ गाडय़ा या डिझेलवर धावत असल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनेकडून ‘मेमू’ सुरू करण्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनमधून ‘मेमू’ गाडय़ा विद्युतीकरणावर चालविल्या जातात. म्हणूनच त्यांना ‘मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (मेमू) गाडय़ा म्हटले जाते.
मागील चार-पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे ‘मेमू’ सेवा सुरू करण्यासाठी मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून जूननंतर ‘मेमू’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने सोलापूरकरांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.
– संजय पाटील, रेल्वे प्रवासी वाहतूक संघटक.
सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत काम पूर्ण होईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच मध्य रेल्वेकडून ‘मेमू’चे रेक घेतले जातील व त्यानंतर प्रथम सोलापूर-पुणे मेमू धावण्यास सुरुवात होईल.
प्रवींद्र वंजारी, वरिष्ठ विभागीय मुख्य परिचालन व्यवस्थापक, सोलापूर.
























































