
अपारंपरिक ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱया सौर आणि पवन ऊर्जानिर्मितीत पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राला नंबर स्थानावर आणण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही केंद्र सरकारची कंपनी महाराष्ट्रात सौर प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी नुकतीच टेंडर मागवली आहेत.
केंद्र सरकारने 2025 पर्यंत देशात 175 गिगावॅट एवढय़ा मोठय़ा क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जानिर्मितीमध्ये पिछाडीवर आहे. त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकार महानिर्मिती, महावितरणसह अन्य खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सौर आणि पवन ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच मुबलक अपारंपरिक ऊर्जा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्रात सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (सेल) ही कंपनी राज्यभरात मोठय़ा प्रमाणात सौर प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी सौर प्रकल्पाचे डिझाईन करणे, उभारणे आणि प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू करण्यापर्यंतची सर्व कामे करण्यासाठी टेंडर मागवले आहे. त्यासाठी संबंधित कंपनीला सुमारे आठ लाख रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागणार आहे.
वीजवाहिन्याही उभारणार
चांगली ऊर्जा असलेल्या ठिकाणी सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे ग्रीडला जोडणाऱया वीजवाहिन्या असतीलच असे नाही. त्यामुळे येथील वीज ग्रीडपर्यंत वाहून नेण्यासाठी उच्चदाब वीजवाहिन्याही उभारण्यात येणार आहेत.

























































