संपत्ती मुलीच्या नावावर केली म्हणून जावयाने सासूचे केले तुकडे तुकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील लामजना (गोटेवाडी) येथून बेपत्ता झालेल्या दोन मावस बहिणींचे बेपत्ता होण्याचे गूढ महिनाभरानंतर पोलिसांनी उकलले आहे. या दोन्ही बहिणींचा त्यांच्या जावयाने निर्घृण खून करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून जमिनीत पुरले. त्यानंतर कुणाला शंका येऊ नये म्हणून त्याने एका गायीची हत्या करून त्या मृतदेहांवर गाईचा मृतदेह पुरला. किल्लारी पोलिसांनी गुरूवारी दुपारी पुरलेले मृतदेह बाहेर काढले.या प्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (82), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (85 दोघेही रा. लामजना ता. औसा जि. लातूर ) या दोघी बहिणी राहत होत्या. 7 जुलै रोजी त्या बेपत्ता झाल्या. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते, त्यामुळे अपहरण झाल्याची तक्रार अॅड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात दिली. 11 जुलैपासून किल्लारी पोलीस शोध घेत होते. तपास सुरू असताना पोलिसांना शेवंताबाई यांचे जावई राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर (रा.लामजना) याच्यावर संशय आला. शेवंताबाई यांना मुलगा नसल्याने त्यांनी जमीन जावयाच्या नावावर न करता मुलीच्या नावे केली होती. नेमका हाच राग मनात धरून जावयाने कोयत्याने वार करून सासुचा खून केला. यावेळी मावस सासू असलेल्या त्रिवेणीबाई यांनी हा प्रकार बघितला. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचाही खून केला. दोघी बहिणींच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले. बाजूस असलेल्या शेततळ्यातील पाळूच्या कपारीत पुरून टाकले. पुन्हा कोणाला शंका येऊ नये, यासाठी एका गायीची हत्या करून त्या मृतदेहांवर पुरण्यात आल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपनिरीक्षक अमोल गुंडे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, आबासाहेब इंगळे यांनी आरोपीच्या शोधात पुणे, मुंबई आदी ठिकाणी चकरा मारल्या, शेवटी मुंबईच्या घाटकोपर येथून आरोपीस अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रारंभी कलम 364 प्रमाणे होणाऱ्या तपासात 302 चे कलम वाढविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी सांगितले.

संशयित आरोपी असलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर याने सदरील गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली. बुधवारी शेततळ्यात जेसीबीच्या साहाय्याने उकरण्याचे काम केले गेले. तळ्यात पाणी असल्याने बीट जमादार उस्तुर्गे व आबा इंगळे, दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी रात्र जागून काढली. गुरूवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक सानप यांनी शवविच्छेदन केले.