
शेतीच्या वादातून पहिल्या पत्नीच्या दोन मुलांनीच वडिलांचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण लोणारे (वय 71, रा. कारेगाव, ता. नेवासा) असे मृताचे नाव असून, भाऊसाहेब लक्ष्णम लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे (दोघे रा. रांजणगाव, ता. नेवासा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनीता ऊर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (वय 36) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
लक्ष्मण लोणारे यांनी 15 वर्षांपूर्वी रांजणगाव येथे जमीन घेतली होती. त्यामुळे काही वर्षे ते पहिली पत्नी व मुलांसह रांजणगाव येथे राहत होते. तेथून ते कारेगाव येथील वडिलोपार्जित दोन एकर जमीन कसण्यासाठी अधूनमधून येत होते. मात्र, पहिली पत्नी चंद्रकलासोबत वाद होऊ लागल्याने ते कारेगाव येथे राहण्यास आले होते. 2015 साली त्यांनी सुनीता यांच्याबरोबर लग्न केले. पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण यांची पहिली पत्नी व मुलांनी कारेगाव येथे येऊन त्यांना मारहाण केली होती. त्यावेळी नेवासा पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. त्याचा खटला सध्या सुरू आहे. 10 सप्टेंबर रोजी लक्ष्मण लोणारे हे घोडेगाव येथे बाजार करण्यासाठी गेले असता, ‘शेतीचे वाद लवकर मिटवून घे; अन्यथा या आठवडय़ात मी तुला संपवून टाकीन,’ अशी धमकी चंद्रकलाने त्यांना दिली होती.
शुक्रवारी सकाळी लक्ष्मण लोणारे हे प्रातःविधीसाठी शेतात गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने सुनीता त्यांना शोधण्यासाठी शेताकडे गेल्या. तेव्हा भाऊसाहेब आणि अशोक हे मक्याच्या शेतातून उसाकडे पळताना दिसले. सुनीता यांनी मक्याच्या शेतात जाऊन पाहिले असता, लक्ष्मण लोणारे हे जखमी अवस्थेत शेतात पडलेले दिसले. त्यांचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. सुनीता यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.






























































