आईला मारहाण; मुलाने केला बापाचा खून, पारनेर तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू दिली नाही म्हणून आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱया वडिलांचा मुलाने लाकडी दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सरपणावर पडून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव मुलगा राहुल झावरे याने केला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आईच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब झावरे (वय 50) असे मृताचे नाव असून, राहुल बाळासाहेब झावरे (वय 25) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा झावरे यांनी फिर्याद दिली आहे.

बाळासाहेब झावरे हा नेहमी दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असे. शुक्रवारी रात्री दारू पिऊन आल्यावर त्याने पत्नी मंदा यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीला घरात कोंडून घेत दरवाजाला कुलूप लावले. काही वेळानंतर त्यांचा मुलगा राहुलदेखील दारू पिऊन मित्रासोबत घरी आला. घराला लावलेले कुलूप पाहून मुलगा व वडिलांमध्ये वाद झाला. त्यानंतर वडिलांनी कुलूप उघडून ते घरात गेले. त्यावेळी बाळासाहेब याने पत्नी मंदाकडे पुन्हा दारू मागितली. मात्र, त्यांनी दारू न दिल्याने परत त्यांना मारहाण करून तो शेताकडे गेला. वडिलांच्या नेहमीच्या जाचामुळे मुलगा राहुलने पाठीमागून जात वडील बाळासाहेब झावरे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे राहुलने रुग्णवाहिका बोलावून त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

आपल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर राहुलने चलाखी करीत टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस दूरक्षेत्रात जाऊन सरपणात पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, चौकशीत हा बनाव असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.