
आजोबा आणि बाप यांच्यात नेहमी होणाऱया घरगुती भांडणावरून मुलाने आजोबांच्या मदतीने जन्मदात्या बापाचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. खून करून बापाचा मृतदेह उसाच्या नालीत फेकून दिला. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ही घटना घडली.
बाबूराव छबुराव निकम (वय 51) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. सोनू उर्फ प्रफुल्ल बाबूराव निकम आणि आजोबा सोपान लक्ष्मण कोपरे (रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बुधवारी (दि. 9) रात्री सुरेगाव शिवारात सुरेगाव ते कोळगाव थडी जाणाऱया कच्च्या रस्त्यावर संजय निकम यांच्या उसाच्या शेताच्या नालीत बाबूराव निकम यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी लताबाई बाबूराव निकम यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
लताबाई यांची सवत झुंबरबाई बाबूराव निकम यांचे वडील सोपान कोपरे आणि बाबूराव निकम यांची घरगुती कारणातून वारंवार भांडणे होत होती. याच कारणातून झुंबरबाई यांचा मुलगा प्रफुल्ल निकम आणि सोपान कोपरे यांनी पती बाबूराव निकम यांचा खून केल्याचे लताबाई निकम यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी सोनू उर्फ प्रफुल्ल निकम आणि सोपान कोपरे यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने कोठडी दिली आहे.



























































