कॅन्सरलाच कॅन्सल करेन, सोनाली बेंद्रेची जिद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अभिनेत्री सोनाली बेंद्रे खरेच लढवय्यी आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्याच्या निर्धारानेच ती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली आहे. तिने आपल्या लांबसडक केसांना कात्री लावली आणि त्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला. किमोथेरपीने केस गळणार आहेत; पण त्यापूर्वीच तिने छानसा हेअरकट केला आहे. ती म्हणते, या लढय़ात मी एकटी नाही हे मला सारखे जाणवते आहे!

सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची बातमी आली आणि अवघे बॉलीवूड हळहळले. सोनाली मात्र धीरोदात्त आहे. तिच्यावर न्यूयॉर्कच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. आज तिने नवा हेअर कटही केला. आपल्या केसांसोबत मजामस्ती करत असतानाच ती भावुक झाली. तिला अश्रू अनावर झाले.

ट्विटरवर याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना सोनाली म्हणते, माझी आवडती लेखिका इसाबेल असेंदेने म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत आपल्यावर आपली ताकद दाखवण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपण किती शक्तिशाली आहोत हे आपल्याला कळत नाही. कॅन्सरशी लढण्याचे अनुभव ज्यांनी ज्यांनी माझ्याशी शेअर केले त्या सर्वांचे मी आभार मानते. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन आव्हान घेऊन येत आहे आणि मी खंबीरपणे त्याला सामोरे जात आहे.