ना मी आळशी, ना मी बेरोजगार; तरी मी सन्मानीय कॉक्रोच, सोनम वांगचुक यांचाही CJP ला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या ऑनलाइन आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्वतःला “सन्माननीय (Honorary) कॉकरोच” असे संबोधले. तरुणांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला दडपण्याऐवजी सरकारने त्यांच्या संदेशाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कॉकरोचच्या प्रतीकाचा वापर करून व्यंगात्मक पद्धतीने सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेला अलीकडच्या काळात मोठा प्रतिसाद मिळत आहे. बेरोजगारी, प्रश्नपत्रिका फुटणे/गळती, सार्वजनिक उत्तरदायित्व आणि शासनव्यवस्थेतील त्रुटी यांसारख्या मुद्द्यांवर ही चळवळ आवाज उठवत आहे. या आंदोलनाशी संबंधित सोशल मीडिया खाती बंद केली जात असल्याचा आणि हॅकिंगचे प्रयत्न होत असल्याचा आरोप संस्थापकांनी केला आहे.

“मी सदस्य नाही, पण सन्माननीय कॉकरोच आहे”

या आंदोलनात औपचारिकरित्या सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता वांगचुक म्हणाले की, “अनेकांनी मला याबाबत बोलण्यास सांगितले आहे. काही जण मला सदस्य होण्याचाही सल्ला देत आहेत. मात्र मी ना बेरोजगार आहे, ना आळशी आहे. त्यामुळे मी या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. पण मी स्वतःला सन्माननीय कॉकरोच मानतो.”

सरकारने संदेश समजून घ्यावा

वांगचुक यांनी या मोहिमेचे कौतुक करताना सांगितले की, तरुणांची अशी सर्जनशील अभिव्यक्ती धोक्याची नसून ती लोकशाहीतील अभिप्रायाचा भाग आहे. “संदेशवाहकाला संपवू नका. संदेशवाहक नष्ट केला तरी संदेश संपत नाही. सरकारने या आंदोलनामागील भावना समजून घ्यायला हवी,” असे ते म्हणाले.

त्यांनी वृत्तपत्रांमधील व्यंगचित्रकारांचे उदाहरण देत सांगितले की, पंतप्रधान, गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांची व्यंगचित्रे काढली म्हणून व्यंगचित्रकारांवर कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे कॉकरोच आंदोलनही व्यंग आणि प्रतीकात्मक भाषेचा वापर करणारी लोकशाहीतील वैध अभिव्यक्ती आहे.

“दगडफेक नाही, डिजिटल क्रिएटीव्ह”

वांगचुक यांनी आंदोलनाच्या अहिंसक आणि कल्पक स्वरूपाचे विशेष कौतुक केले. “इतर काही देशांप्रमाणे रस्त्यावर उतरून हिंसक मार्ग स्वीकारण्याऐवजी हिंदुस्थानातील तरुणांनी आपली नाराजी क्रिएटीव्ह डिजिटल माध्यमातून व्यक्त केली आहे. हे ‘विश्वगुरू’ हिंदुस्थानचेच दर्शन घडवते,” असे ते म्हणाले.

त्यांच्या मते, अशा अभिव्यक्तीचा आदर करणे आणि त्यातील संदेश समजून घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केल्याचा आरोप

कॉकरोच जनता पार्टीशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली जात असल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना वांगचुक यांनी इशारा दिला की, तरुणांच्या अभिव्यक्तीची दारे बंद केल्यास त्यांचा रोष अनियंत्रित दिशेने जाऊ शकतो.

नेपाळमधील राजकीय अस्थिरतेचे उदाहरण देत त्यांनी इशारा दिला की, सर्जनशील अभिव्यक्तीवर निर्बंध आणल्यास अनपेक्षित परिणाम उद्भवू शकतात.

तरुणांना अहिंसेचे आवाहन

वांगचुक यांनी तरुणांना शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवत राहण्याचे आवाहन केले. “कितीही नाराजी असली तरी हिंसेचा मार्ग स्वीकारू नका. मात्र सरकारनेही तरुणांना त्या दिशेने ढकलू नये,” असे ते म्हणाले.