लडाख दुसरे मणिपूर बनण्याची भीती वाटत होती, सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखच्या लोकांचा अद्याप पूर्णपणे विश्वास जिंकलेला नाही. लडाखचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये नुकतीच झालेली चर्चा एक सकारात्मक पाऊल आहे. मात्र, गेल्या आठवडय़ात सर्वत्र नकारात्मक वातावरण होते, सर्वत्र संघर्षाची स्थिती होती. लडाख दुसरे मणिपूर बनते की काय, अशी भीती वाटत होती, असे म्हणत लडाखमधील सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनी एपूण परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

एका मुलाखतीत त्यांनी लडाखसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत मत व्यक्त करताना लडाखच्या परिस्थितीतबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, केंद्राने लडाखच्या लोकांचा पूर्ण विश्वास जिंकलेला नाही. एक वेळ अशी होती की, सरकारसोबत कोणतीही सार्थक चर्चा होऊ शकणार नाही, असे वाटत होते. सर्वत्र संघर्ष होता. लोक आपसांमध्ये भांडत होते. लेह आणि कारगीलमध्ये दुरावा निर्माण होत होता, बौद्ध धर्मीय बौद्धांसोबत तर मुस्लिम हे मुस्लिमांसोबतच भांडत होते. अशा वेळी लडाख दुसरे मणिपूर बनण्याच्या मार्गावर जात आहे, असे वाटत होते. मात्र, गेल्या आठवडय़ात केंद्रासोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे दृष्टिकोन थोडा बदलला आहे. अन्यथा मी पूर्णपणे निराश झालो होतो, असे वांगचुक म्हणाले.

सरकारच्या भूमिकेबाबत साशंक

लडाखमधील संघटनांसोबत झालेल्या चर्चेनंतर लडाखमध्ये लोकशाही बहाल करणे आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद 371अंतर्गत घटनात्मक सुरक्षा देण्याचा सरकार विचार करत आहे. मला तुरुंगातून मुक्त करण्याच्या आदेशात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि सार्थक चर्चा करणे, असे स्पष्टपणे म्हटले होते. मात्र, सरकारने दिलेली ही हमी प्रत्यक्षात प्रतिबिंबित होत नाही, अशी टीका वांगचुक यांनी केली.

मी डिजिटल इंडियात डिजिटली बेकार

सोनम वांगचुक यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, मला आठ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी माझा मोबाईल फोन जप्त केला होता. आता तुरुंगातून बाहेर पडून दोन महिने झाले तरीही माझा फोन मला परत मिळालेला नाही. माझे ई-मेल आणि डिजिटल रेकॉर्ड सर्व सरकारच्या ताब्यात आहेत. सरकारने मला अर्धे तुरुंगातच ठेवले आहे. डिजिटल इंडियामध्ये मी डिजिटल स्वरूपाने बेकार झालो आहे, अशी हतबलता वांगचुक यांनी व्यक्त केली.