
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
देशातील विविधता मान्य न करणाऱया लोकांकडून आता देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षातर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काही लोकांना देशातील विविधता पसंत नाही. धर्म आणि विचारसरणीच्या आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव सुरू आहे. काय खायचे? काय प्यायचे? कोणते कपडे परिधान करायचे? हे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. देशाच्या मूळ भावनेला तिलांजली देण्याचे काम सध्या सुरू असून लोकशाही संस्था समाप्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. एक उत्तम जीवन जगण्यासाठी देशवासीयांकडून केले जाणारे प्रयत्न विद्यमान सरकार हाणून पाडत आहे. त्याचप्रमाणे नवी धोरणे उद्योगधार्जिणी असल्यामुळे ठरावीक लोकांना त्याचा फायदा होत आहे, असे त्यांनी सांगितले. जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने काँग्रेस पूर्ण करेल, असेही त्या म्हणाल्या.



























































