
सामना ऑनलाईन । ठाणे
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अभिनेता अरबाज खान याच्या नावाच्या खळबळजनक खुलाश्यानंतर आयपीएल बेटिंग प्रकरणाचा मास्टर माईंड सोनू जालान याची ठाणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आयपीएलप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी सीबीआयची एक टीम ठाण्यामध्ये पोहोचली होती. त्यांच्या चौकशीत आयपीएल बेटिंग प्रकरणामध्ये आणखी एक खुलासा झाला असून बॉलिवूडमधील अजून एका सेलिब्रिटीचं नाव उघड झालं आहे.
सोनूने असा खुलासा केला आहे की, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्यामार्फत वेगवेगळ्या नावांनी सट्टा लावतात. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक केल्यानंतर त्याने एका बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाव उघड केलं आहे. हा सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान. सोनूने केलेल्या खुलाश्यानुसार, साजिद खानने त्याच्यामार्फत सात वर्षांपूर्वी सट्टा लावला होता. सोनूने दिलेल्या माहितीवरून आता साजिद खानला समन्स धाडण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी बेटिंग प्रकरणांमध्ये निर्माता पराग सिंघवी आणि समीर बुद्धा यांनाही समन्स धाडले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खान याला ठाणे पोलिसांनी समन्स बजावले होते. बेटिंग प्रकरणाचा मास्टमाईंड बुकी सोनू जालानच्या चौकशीदरम्यान अरबाज खानचे नाव समोर आले होते आणि त्यानंतर त्याला समन्स बजावण्यात आले. अभिनेता अरबाज खान यानेही सट्टा लावल्याची कबुली दिली. गेल्या पाच वर्षांपासून कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात असल्याची कबुलीही त्याने पोलिसांपुढे दिली होती. अरबाजने आयपीएलच्या सट्ट्यात पावणेतीन कोटी रुपये घालवल्याची कबुलीच दिली होती. पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार बनवला असल्यामुळे अरबाज कारवाईच्या कचाटय़ातून मात्र ‘सटकला’.
Bookie Sonu Jalan has named Director Sajid Khan, has said, around 7 years ago Sajid used to place bets on cricket matches. Thane police is investigating into Sonu’s claims but have not decided to summon Sajid for joining the investigation yet: Thane crime branch sources pic.twitter.com/Un0DjIShmj
— ANI (@ANI) June 5, 2018
१५ मे रोजी केली अटक
ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजीचे रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक केली होती. त्यातून बुकी सोनू जालानचे नाव पुढे आले. पोलिसांनी सोनू जालानची कुंडली काढून त्याला अटक केली. त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सोनू जालान हा सट्टेबाजीच्या काळ्या दुनियेत सोनू मालाड म्हणून ओळखला जातो. संपूर्ण आशिया खंडात त्याचे नेटवर्क आहे.



























































