सौरभ गांगुलीने डाव अर्ध्यावर सोडला? धक्कादायक ट्विटने क्रिकेटविश्वात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा त्यांच्या एका धक्कादायक ट्विटमुळे जोरात सुरू आहे. गांगुली यांनी ट्विटमधून आपल्या नव्या इनिंगसाठी चाहत्यांच्या पाठिंब्याची मागणी केल्याने त्यांनी आपला डाव अर्धवट सोडल्याचे बोलले जात आहे. आपण पुढे काय करणार याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिलेली नाही. पण बंगाल टायगर म्हणून ओळखले जाणारे गांगुली आता राजकारणात एण्ट्री करतील, अशी शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

1992मध्ये मी माझा क्रिकेटमधील प्रवासाचा श्रीगणेशा केला होता. 2022मध्ये माझ्या क्रिकेट कारकीर्दीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. आतापर्यंत क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रिकेटमुळे तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला मिळाला आहे. असाच पाठिंबा माझ्या भविष्यातील नव्या वाटचालीला तुमच्याकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. ती वाटचाल तुम्हा सर्वांसाठी लाभदायकच ठरेल. मी प्रत्येक पाठीराख्याचे आभार मानतो, असे सौरभ गांगुली यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गांगुली यांनी राजीनामा दिलेला नाही -जय शहा

सौरभ गांगुली यांनी केलेल्या ट्विटचा चुकीचा अर्थ लोकांनी करून घेतला आहे. त्यांनी मुळीच बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआय सचिव जय शहा यांनी तत्काळ केले. मात्र गांगुली यांच्या ट्विटने ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.