IND vs SA T20 – गंभीरचे प्रयोग अंगलट; कर्णधार-उपकर्णधार सपशेल अपयशी, दुसर्‍या लढतीत पाहुण्यांचा विजय

पाहुण्या संघाच्या वेगवान माऱ्यापुढे टीम इंडियाचा त्रेधातिरपीट उडाली आणि न्यू चंदीगडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 1-1 अशी बरोबरी साधली. सलामीला येत 90 धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डी कॉक याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या हिंदुळ्यांपुढे दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 214 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माही माघारी परतला. त्याने 17 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या स्थानावर प्रयोग म्हणून पाठवलेल्या अक्षर पटेल यानेही गेल्या लढतीप्रमाणे संथ खेळी केली. त्याने 21 चेंडूत 21 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही खराब फॉर्म कायम राहिला. तो 5 धावांवर बाद झाला.

एकामागोमाग एक बॅटर बाद होत असताना तिलक वर्माने एक बाजू लावून धरली. त्याने हार्दिक पंड्या (20 धावा) आणि जितेश शर्मा (27 धावा) यांच्यासोबत छोट्या भागिदारी करत हिंदुस्थानच्या विजयाची आशा कायम ठेवली होती. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज फक्त हजेरी लावून माघारी परतले आणि हिंदुस्थानचा पराजय निश्चित झाला. तिलक वर्माने 34 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.

आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाजांनी सर्वच्या सर्व 10 विकेटची लयलूट केली. ओटनेल बार्टमॅन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लुंगी निगीडी, मार्को जायनस आणि ल्युथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

210 धावांचा पाठलाग करताना एकही विजय नाही

दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानने 210 धावांचा पाठलाग करताना एकदाही विजय मिळवलेला नाही. हिंदुस्थानपुढे विरोधी संघाने 7 वेळा 210 हून अधिक धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र यातील एकाही आव्हानाचा हिंदुस्थानला यशस्वी पाठलाग करत आलेला नाही.