
स्वमग्नता अर्थात ऑटिझममुळे तसेच शैक्षणिक अक्षमतेमुळे शाळेत, समाजात पुरेशा आत्मविश्वासाअभावी चाचरत वावरणाऱया शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन अक्षरशः दणाणून सोडले. निमित्त होते ते ‘चाईल्ड रिअॅक्ट फाउंडेशन’ या संस्थेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘अंतरीक्ष’ या आगळ्या-वेगळय़ा महोत्सवाचे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरातील 200हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या महोत्सवात सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर केले.
चाईल्ड रिअॅक्ट फाउंडेशनचे संस्थापक आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासाच्या समस्या असतात किंवा ज्यांना शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या वेगाने आत्मसात करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावलेला असतो. स्वमग्न विद्यार्थ्यांना समाजात संवाद साधायला अडचणी येतात. यामुळे त्यांच्या पालकांचीही चिडचिड होते. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अशा विद्यार्थ्यांना समाजाशी जोडून घेण्याचा सकारात्मक प्रयत्न करत राहणे आवश्यक असते. ‘अंतरीक्ष’मध्ये स्वमग्न विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या कलागुणांना मोकळा वाव देण्यामागे हाच विचार आहे.
विशेष म्हणजे, चाईल्ड रिअॅक्ट फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमात ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओ थेरपिस्ट अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
























































