‘स्टार ट्रेक’मुळे नासाकडे आकर्षित झाले, स्वाती मोहन यांचा बायडन यांच्याशी संवाद

नासाचे पर्सिव्हरन्स रोव्हर यान मंगळावर यशस्वीरीत्या उतरले असून त्यामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या स्वाती मोहन यांचे मोलाचे योगदान आहे. एरोस्पेस इंजिनीअर असलेल्या स्वाती यांनी या ऐतिहासिक मोहिमेत रोव्हरचे संचालन आणि नियंत्रण यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली, त्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वाती यांचे कौतुक केले आहे. या वेळी लहानपणी टीव्हीवरील ‘स्टार ट्रेक’ हा लोकप्रिय शो बघून नासाचा मार्ग निवडल्याचे स्वाती यांनी बायडन यांना सांगितले.

मंगळावर रोव्हरचे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल आणि अमेरिकेचा विश्वास वाढवल्याबद्दल जो बायडन यांनी नासाच्या टीमचे काल अभिनंदन केले. तसेच व्हिडीयो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. अंतराळातील अद्भुत दृश्यांनी लहानपणी माझे लक्ष वेधून घेतले आणि मी अंतराळ संशोधनात काम करण्याचे ठरवले, असे स्वाती यांनी या वेळी बायडन यांना सांगितले.

स्वाती पुढे म्हणाल्या, पर्सिव्हरन्स रोव्हर हे माझे जेपीएलमधील पहिले मिशन होते. आमचे एक पुटुंबच बनले होते. लँडिंगचा दिवस आणि त्याआधीचे काही आठवडे सगळे सुरळीत होते. मात्र ती शेवटची सात मिनिटे खूप रोमांचक होती. धडधड वाढली होती. टचडाऊनचा कॉल देणे, ज्या जागी आपण कधीही पोचलो नाही, तिथले फोटो बघणे, सारेच स्वप्नवत होते. रोव्हरच्या लँडिंगनंतर आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. अद्याप उत्कंठा तशीच आहे. अजून बरेच काही हाती गवसणे बाकी आहे. मंगळावरील जीवसृष्टीचे पुरावे मिळतील अशी आशा वाटतेय.

हिंदुस्थानींच्या हाती अमेरिकेचा लगाम – बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संवाद साधल्याबद्दल स्वाती मोहन यांनी त्यांचे आभार मानले. त्यावर बायडेन म्हणाले, हा तर माझा सन्मान आहे. हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तींच्या हाती अमेरिकेचा लगाम आहे. तुम्ही (स्वाती मोहन), माझ्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, माझे भाषण लिहिणारे विनय रेड्डी…मी तुमचे आभार मानतो.

आपली प्रतिक्रिया द्या