
अमेरिकेच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक खास भेट दिली आहे. उद्योजक महिलेने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन फर्स्ट क्लास विमानाच्या तिकिटांसोबत 10 हजार डॉलर देण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा देखील या महिलेने अनोख्या पद्धतीने केले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घोषणेनंतर कर्मचारी देखील भावूक झाले.
स्पॅनक्सच्या संस्थापक सारा ब्लॅकली सगळ्यात कमी वयाची महिला अब्जावधी रुपयाच्या संपत्तीची मालकीण आहे. या आधी या महिलेने घरोघरी फॅक्स मशीन विकले होते. आता तिची परिस्थिती इतकी बदलली आहे की तिने 1.2 बिलियन डॉलरचा करार केला आहे.
गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओत कंपनीची मालकीण सारा ब्लॅकली यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह मोठ्या कराराच्या यशाचा जल्लोष साजरा केला. या व्हिडीओत सारा ब्लॅकली म्हणत आहे की, माझ्या विश्वभ्रमंतीचे कारण तुम्हाला कळते आहे का? त्यानंतर ती म्हणते की तुम्ही सगळे जगाच्या कोणत्याही भागातील दोन फर्स्ट क्लास तिकीट बुक करू शकतात.
सारा ब्लॅकली म्हणाली की प्रत्येकाला प्रथम श्रेणीचे दोन तिकिटे आणि 10 हजार अमेरिकी डॉलर मिळतील. या घोषणेनंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्लॅकलीने जेव्हा कर्मचाऱ्यांना विचारले तुम्हाला कुठे जायचे आहे? तेव्हा कुणी बोरा बोरामध्ये हनीमूनसाठी सांगितले, कुणी द. आफ्रिकेत सफारीवर जायचे आहे असे सांगितले.
ब्लॅकली म्हणाली, ‘जेव्हा मी म्हणत होते की ही कंपनी एक दिवस 20 मिलियन अमेरिकी डॉलरची होईल, तेव्हा अनेकजण माझ्यावर हसत होते. आता बघा कंपनी किती मोठी झाली.’




























































