Ind Vs Aus – स्विंगशी ’36’चा आकडा!

जांभळाच्या झाडाला गदागदा हलवले की जांभळ जशी खाली पडतात तशीच अवस्था अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाची झाली… अवघ्या 36 धावांत टीम इंडियाचा संपूर्ण संघ माघारी परतला… मुंग्यांची रांग जशी एका रांगेत चालते तसेच सर्व खेळाडू एकामागोमाग एक पॅव्हेलियनकडे चालते झाले… त्यातल्या त्यात शमी रिटायर्ड हर्ट झाल्याने ‘ऑल आउट’ होण्याचा ठपका लागण्यापासून सुटका झाली.

गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट कसोटीत पहिल्या डावात टीम इंडियाने 53 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. विशेष म्हणजे आजपर्यंत डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने समोरील संघाला पहिल्या डावात अशी आघाडी घेऊ दिली नाही हा इतिहास आहे. हा इतिहास आपण पुसला आणि पुढच्याच डावात आपण इतिहास रचला.

सकाळच्या सत्रात स्विंग होणाऱ्या चेंडूने टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. ना लाईन लेंथचा अंदाज, ना स्विंगचा. आला चेंडू लाव बॅट अन पवेलीयन गाठ असेच सुरू होते. एकही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही ही मोठी शोकांतिका.

पृथ्वी नेहमीप्रमाणे बाद झाला… बॅट आणि पॅडच्या मधील पोकळी त्याच्या दांड्या गुल करण्यात मोलाचा वाटा उचलत आहेत आणि ज्यात काहींना सचिनची, लाराची आणि सेहवागची छबी दिसते तो पृथ्वी गेल्या वर्षभरात नेहमीनेहमी त्याच पद्धतीने बाद होतोय, अरे व्हेरिएशन तरी दे…

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने पृथ्वी शॉ याच्या खेळातील चूक अचूक हेरली… पण फायदा काय? कोट्यवधी रुपये मोजून आयपीएलमध्ये दिल्लीचा प्रशिक्षक असणाऱ्या पॉंटिंगने आपल्याच संघातील सलामीवीर पृथ्वीच्या त्या पोकळीवर काय काम केले? असा सवाल उपस्थित करणे क्रमप्राप्त आहे.

दुसरीकडे पुजारातील ‘वॉल’, कोहलीतील ‘रणमशिन’, रहाणेचा ‘क्लास’, विहारीचे ‘टेम्परामेंट’ सर्व कसे वाऱ्याच्या झोतात फोलपटाप्रमाणे उडाले… कमिन्स आणि हेजलवूड या जोडीने टीम इंडियाची नाडी अचूक ओळखली अन स्विंगशी 36 चा आकडा असणारा हिंदुस्थानच्या संघाने चाळीशीही गाठली नाही.

पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा कर्णधार विराट कोहली हा सामना संपल्यावर मायदेशी परतणार आहे. अजून टीम इंडियाला 3 कसोटी खेळायच्या आहेत. विराट नसताना टीम इंडियाची नौका कोण पार लावणार हा सवालही आहेच. त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे रोहित शर्मा… अर्थात तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याला संघात स्थान मिळणे मुश्किल. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला ‘तारणहार’ शोधावाच लागणार.

फिरकीला ‘आस्मान’ दाखवणारा हिंदुस्थानचा संघ विदेशात स्विंगचा नेहमीच बळी ठरला आहे. 1974 ला लोर्ड्सवर 42, 1947 ला ब्रिस्बेनमध्ये 58, 1952 ला मँचेस्टरमध्ये पुन्हा 58, 1996 ला डरबनमध्ये 66, 1948 ला मेलबर्नमध्ये 67 असा ‘लो स्कोर’ आपण विदेशातील मैदानावर ‘स्विंग’च्या जाळ्यात अडकवून नोंदवला आहे. खेळपट्ट्या पाटा झाल्या तरी विदेशातील ‘स्विंग’च्या लाटा टीम इंडियाच्या भल्याभल्या ‘वॉल’ जमीनदोस्त करत आल्याय… आगामी काळात ‘टी-20’ची चटक लागलेले खेळाडू SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशात कसा तग धरणार हा सवाल ‘अनुत्तरित’ करून जातो…

आपली प्रतिक्रिया द्या