शिवस्मारकाच्या शुभारंभाला गेलेल्या बोटीला अपघात, समुद्रात नक्की काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मोठा गाजावाजा करून बोटींनी कंत्राटदार शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अरबी समुद्रामध्ये नेले. शिवस्मारकाचा शुभारंभ याची देहा याची डोळा पाहता येणार म्हणून सर्व आनंदात होते. परंतु अचानक दुधात मिठाचा खडा पडावा तसे धडले. शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी जाणाऱ्या तीन बोटींपैकी एक बोट खडकावर आदळली आणि बोटीत पाणी शिरू लागले. बोटीत अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला.

शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी निघालेल्या तीनपैकी एका बोटीमध्ये अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते होते. याच बोटीत अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली, खडकावर आदळल्याने त्यात पाणी शिरले. या बोटीमध्ये तब्बल पंचवीस ते तीस जण होते. बोटीतील पाणी वाढू लागल्याने सर्वजण घाबरले. आता काय होणार या विचारात असतानाच रेस्क्यू बोट आली आणि बुडत असलेल्या लोकांना त्यांनी आपल्याकडे खेचले. बोटीतील सर्वांना वाचवण्यात यश आल्याचे म्हटले जात असले तरी नेमके किती जण बोटीमध्ये होते याविषयी नेमकी माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, बोटीतील एक जण बेपत्ता असल्याची माहिती विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सिद्धेश पवार असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शिवस्मारकाच्या शुभारंभाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याचा आरोप शेकापच्या जयंत पाटील यांनी केला आहे.