3 दिवस ऑफिसला चालत जा पण मुलांना फटाके फोडू द्या! जग्गी वासुदेव यांची #DontBanCrackers हॅशटॅग मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दर वर्षी दिवाळी सणाच्या वेळी प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित होतो. यंदाही काही राज्यांनी फटाके खरेदी विक्रींवर बंदी घातली असून ठराविक वेळी फटाके फोडण्याची मुभा दिली आहे. परंतु मुलांना फटाके फोडू द्या, त्यांचा आनंद हिरावून घेऊ नका असे आवाहन अध्यात्मिक गुरू जग्गी वासूदेव यांनी केले आहे. पालकांनी हवे तर तीन दिवस ऑफिसला चालत जा परंतु मुलांना फटाके फोडू द्या असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यासाठी ट्विटरवर त्यांनी #DontBanCrackers ही हॅश टॅग मोहीमही चालवली आहे.


जग्गी वासूदेव यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात जग्गी म्हणतात गेली काही वर्षे मी फटाके फोडले नाहीत. परंतु लहानपणी दिवाळीच्या एक महिन्यापूर्वी आम्ही फटाके फोडायचे स्वप्न पहायचो. दिवाळीनंतरही आमच्याकडे जे फटाके उरले असतील ते एक एक दिवस फोडायचो. वायू प्रदूषण होत आहे म्हणून मुलांना फटाके फोडू न देणे हे चुकीचे आहे. त्यांच्याकडून हा आनंद हिरावून घेता कामा नये. यासाठी पालकांनी त्याग करणे गरजेचे आहे. जर फटाके फोडल्याने प्रदूषण वाढत असेल तर पालकांनी तीन दिवस चालत ऑफिसला जावे. गाडीने प्रवास न केल्याने वायू प्रदूषण होणार नाही असे जग्गी म्हणाले, तसेच मोठ्यांनी फटाके फोडू नये त्यामुळेही वायू प्रदूषणाला आळा बसेल असेही जग्गी म्हणाले. यासाठी जग्गी यांनी ट्विटरवर #DontBanCrackers ही हॅश टॅग मोहीम चालवली आहे.