सुपरस्टार मेस्सीची झलक पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेर यंदाच्या विश्वचषकात सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या अफलातून गोलच्या बळावर अर्जेंटिनाने मेक्सिकोला 2-0 असे पराभूत करीत विजयी दौडीला प्रारंभ केला. मेस्सीचा हा बहुधा अखेरचा विश्वचषक असल्याने त्याच्याकडून त्याच्या चाहत्यांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळेच काल मध्यरात्रीनंतर लुसेल स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या अर्जेंटिना-मेक्सिको लढतीसाठीच्या गर्दीने तब्बल 28 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. 1994च्या अमेरिकेतील फिफा वर्ल्ड कप फायनलनंतर रविवारी मध्यरात्रीनंतरच्या लढतीला जमलेली ही फुटबॉल शौकिनांची विक्रमी संख्या ठरली. लुसेल स्टेडिअमवर पार पडलेल्या या लढतीत मेस्सीच्या अफलातून खेळाची झलक पाहण्यासाठी तब्बल 88,966 प्रेक्षक उपस्थित होते. मेस्सीनेही आपल्यासाठी उपस्थित चाहत्यांची निराशा होऊ दिली नाही.