स्पोर्ट सिटीवर चढणार पुन्हा एकदा किकचा फिव्हर, महिला फुटबॉल वर्ल्डकपची फायनल नवी मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पोर्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबई नगरीवर पुन्हा एकदा फुटबॉलचा फिव्हर चढणार आहे. 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या वर्ल्डकपचे 32 सामने येत्या 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान भुवनेश्वर (ओडिशा), फार्तोडा (गोवा) आणि नवी मुंबई (महाराष्ट्र) या शहरांमध्ये होणार आहेत. फिफा आणि लोकल ऑर्गनायझर कमिटीने या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली. संघांची सोडत येत्या 24 जून रोजी काढण्यात येणार आहे.

फिफा 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचा सलामीचा सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर येत्या 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. सलामीच्या सामन्यासह एकूण 6 सामने भुवनेश्वर येथे होणार आहेत. गोवा येथील फार्तोडा शहरातील नेहरू स्टेडियमवर एकूण 16 सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये दोन उपउपांत्य आणि उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश असणार आहे. दोन उपउपांत्य फेरीतील सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या विश्वचषकाचे एकूण दहा सामने नवी मुंबईत होणार आहेत. अंतिम सामना येत्या 30 ऑक्टोबर रोजी डी. वाय. पाटील स्टेडियमवरच खेळला जाणार आहे.

11 ते 18 ऑक्टोबरदरम्यान सुमारे 24 सामने खेळले गेल्यानंतर 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी उपउपांत्य फेरी होणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरीतील सामने 26 ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. या विश्वचषकात 16 संघ चार गटांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये हिंदुस्थान, चीन, जपान, न्यूझीलंड, अमेरिका, पॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चिली, कोलंबिया या संघांचा समावेश असणार आहे.