
टीम इंडियातील खेळाडूंचे प्रयोग फक्त आयर्लंड दौऱ्यापर्यंतच चालणार, असे हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुख्य संघ खेळणे अपेक्षित आहे, मात्र टीम इंडियाच्या भरगच्च वेळापत्रकामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखालील संघच खेळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ 26 व 28 जूनला आयर्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा मुख्य संघ 1 ते 5 जुलैदरम्यान गतवर्षीचा राहिलेला अखेरचा कसोटी सामना खेळणार आहे. ही कसोटी संपूर्ण पाच दिवस चालली तर रोहितसह कसोटी संघातील खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणे कठीण होणार आहे. कारण या खेळाडूंना विश्रांतीसाठी केवळ एक दिवस मिळणार आहे. त्यामुळेच ‘बीसीसीआय’ने हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या टीम इंडियाला आयर्लंड दौऱयानंतर इंग्लंडमध्ये बोलावले आहे. हिंदुस्थानचा हाच संघ इंग्लंडविरुद्धचे दोन सराव सामने खेळणार आहे.
…म्हणून टी-20 संघाची घोषणा नाही
हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानचा कसोटी सामना तीन किंवा चार दिवसांत संपला तर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रोत बुमरा ह व मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळवण्याचा विचार होऊ शकतो. मात्र या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखाली संघ खेळवायचा हा ‘बीसीसीआय’चा बी प्लॅन आहे. त्यामुळेच बीसीसीआयने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या टी-20 संघाची घोषणा केलेली नाही.



























































