
सामना ऑनलाईन, मुंबई
कोळी-आगरी एकता समाज क्रिकेट स्पर्धेत वर्सोवा संघावर ४ धावांनी मात करून मुंबई ‘अ’ संघ अंतिम विजेता ठरला. कोळी-आगरी एकता समाज मंडळाने ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत भिवंडी, नवी मुंबई, सफाळा, पनवेल, उलवा नोड, रसायनी, वर्सोवसह १६ संघांनी भाग घेतला होता.
गोराई गावात समुद्रकिनारी भरपावसात रंगलेल्या अंतिम सामन्यात कोळी, आगरी आणि ख्रिश्चन कोळी समाजाच्या खेळाडूंनी उत्तम दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करीत गोराईकर आणि पर्यटकांना रोमांचित केले. चार षटकांच्या या सामन्यात मुंबई (अ) संघाने वर्सोवा संघासमोर ३९ धावांचे आव्हान ठेवले होते. वर्सोवा संघ चार षटकांत ३५ धावा करू शकला. त्यामुळे मुंबई (अ) संघ अंतिम विजेता ठरला. या सामन्यात धडाकेबाज २० धावा करणारा उत्तन संघाचा रॉय लॉरेन्स नून उत्कृष्ट फलंदाज तर एका षटकात ३ बळी घेणारा उत्तन संघाचा रेनॉल्ड तुलजी उत्कृष्ट गोलंदाज ठरला. मालिकावीर म्हणून वर्सोवा संघाचा राजेश सौदी याला घोषित करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळय़ास दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी, कुमार भंडारी, दिवाकर म्हात्रे, गोराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश नागरे, राजन कोळी, प्रदीप पाटील, अण्णा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

































































