
सामना ऑनलाईन, पुणे
SSC म्हणजेच 10वीचे निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. राज्यामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ही 77.10 टक्के इतकी आहे. दहावी इयत्तेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थ्याची नोंदणी झाली होती. त्यातील 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी 12 लाख 47 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिनींनी यंदाही निकालांमध्ये बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 10.64 टक्क्यांनी जास्त आहे.
विभागवार निकालावर नजर टाकल्यास या वर्षी देखील कोकणानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाची टक्केवारी ही 88.38 टक्के असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागात 67.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालामध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीचा निकाल हा 89.41 टक्के इतका लागला होता तर यंदा 77.10 टक्के इतका निकाल लागला आहे. तोंडी परीक्षा नसणे आणि बदललेली पेपर पद्धती यामुळे निकालात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ही 4028 अतकी होती ती यंदा रोडावली असून अवघ्या 1794 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
दहावीचा विभागवार निकाल
- पुणे- 82.48 टक्के
- नागपूर 67.27 टक्के
- संभाजीनगर-75.20 टक्के
- मुंबई-77.04 टक्के
- कोल्हापूर-86.58 टक्के
- नाशिक-77.58 टक्के
- अमरावती-71.98 टक्के
- लातूर-72.87 टक्के
- कोकण-88.38 टक्के
- कोकण विभागाने नेहमीप्रमाणे बाजी मारली
- विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
- दहावीतील एकूण 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
































































