
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचं महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हंटल्याचं एबीपी माझाच्या वृत्तात म्हटलं आहे.
दर महिन्याच्या 7 ते 8 तारखेपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत असतो, मात्र आता जानेवारीची 9 तारीख उलटून देखील अद्याप कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
एसटी महामंडळाकडून मागणी केलेली 327 कोटी रुपयांच्या डिसेंबर महिन्यातील विविध सवलतींच्या रकमेचीपूर्ती राज्य सरकारकडून न झाल्याने यंदाचा पगार रखडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 88 हजारांच्या घरात आहे.
राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नाही. शासन सहानुभुतीच्या फक्त गप्पा मारतं, जाहिरातीत फक्त गप्पा दिसतात, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. राज्य सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि-सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस- पवार सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे, असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
























































