
घणसोलीतील सिम्प्लेक्स वसाहतीच्या पुनर्विकासासाठी महासभेने क्लस्टरला दिलेल्या स्थगितीप्रकरणी राज्य सरकारने अहवाल मागवला आहे. महासभेने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आपला अहवाल राज्याच्या नगरविकास विभागास सादर करण्याचे आदेश शासनाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिले आहेत.
घणसोली येथील सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्स वसाहतीच्या पुनर्विकासासाठी नवी मुंबई पालिकेने क्लस्टरला मंजुरी दिली. त्यानंतर याबाबत चर्चा करण्यासाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी एक प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला. या प्रस्तावावर सुमारे दोन दिवस चर्चा चालली. त्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी घणसोलीतील क्लस्टरला स्थगिती दिली. या घडामोडींनंतर सिम्प्लेक्स वसाहतीमधील श्री गणेश सोसायटीने महाराष्ट्र शासनाकडे धाव घेतली. त्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.































































