
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये तीन वन डे, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेआधी यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून हिंदुस्थानी खेळाडूंना उद्देशून स्लेजिंग करून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू स्टीव वॉ याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेजिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला डिवचल्यास आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी विराटसह संघातील इतरांनाही प्रेरणा मिळेल असे स्टीव वॉला वाटते.
हिंदुस्थानच्या संघाने मागील ऑस्ट्रेलियन दौऱयात कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला होता. या दौऱयात टीम पेनच्या ऑस्ट्रेलियन संघाने विराट कोहलीच्या ब्रिगेडसोबत शाब्दिक चकमक केली होती. याचा परिणाम मालिकेवर झाला होता. ऑस्ट्रेलियाने ही मालिका गमावली होती. यामुळे स्टीव वॉने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालिकेआधीच सावध राहण्याचा इशारा केला आहे. पुढे तो म्हणाला, विराट कोहलीसारख्या महान खेळाडूला स्लेजिंग करून काही फायदा होणार नाही. त्यांच्यावर अशा प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका.
ही मालिका गाजवायचीय
ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थानी दौऱयात स्टीवन स्मिथने धावांचा पाऊस पाडला होता. मात्र मालिका जिंकण्यात कांगारूंना यश लाभले नाही. या मालिकेत विराट कोहलीला स्टीवन स्मिथसारखी फलंदाजी करता आली नव्हती. या अपयशाला मागे सारत विराट कोहली आगामी मालिकेत धावाच धावा उभारण्यासाठी सज्ज झाला असेल. त्याला ही मालिका गाजवायची असेलच, असेही स्टीव वॉ यावेळी म्हणाला.
बायोबबलमुळे मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो
हिंदुस्थानी खेळाडूंना आयपीएलसाठी तब्बल 80 दिवस बायोबबल अर्थातच सुरक्षित वातावरणात राहावे लागले होते. त्यानंतर आता यूएईतून हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तेथेही सर्वांना बायोबबलमध्ये राहावे लागणार आहे. यावेळी विराट कोहली म्हणाला, बायोबबलमध्ये आम्ही सुरक्षित राहत आहोत. आमचा संघही छान आहे. पण सातत्याने बायोबबलमध्ये राहिल्यास मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. क्रिकेट मालिकांच्या वेळापत्रकाच्या कालावधीवरही लक्ष पेंद्रित करणे गरजेचे आहे, असेही विराट कोहलीला वाटते.




























































