
शेअर बाजारात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी RBI च्या रेपो रेटच्या घोषणेचा परिणाम दिसून आला. शेअर बाजाराची सुरुवात मंदावलेली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची मोठी कपात जाहीर करताच बाजाराचा उत्साह संचारला आणि अचानक रेड झोनमध्ये व्यवहार करणाऱ्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 700 पेक्षा जास्त अंकांनी उडी घेतली. सेन्सेक्सने 82 हजाराचा तर निफ्टीने 25 हजाराचा टप्पा पार केला आहे.
शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये उघडले. बीएसई सेन्सेक्सने 81,442.04 च्या मागील बंदच्या तुलनेत थोडीशी घसरण होत 81,434.24 वर व्यवहार सुरू केला आणि सकाळी 10 वाजता आरबीआय गव्हर्नरने रेपो रेटमध्ये 50 बीपीएस कपातीची घोषणा करताच सेन्सेक्स 710 अंकांनी वाढून 82,165 वर पोहोचला. आरबीआयच्या घोषणेनंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही झपाट्याने वधारला. निफ्टी त्याच्या मागील बंदच्या 24,750.90 च्या तुलनेत 24,748.70 वर उघडला आणि रेपो रेट कपातीच्या घोषणेनंतर सुमारे 250 अंकांच्या वाढीसह त्याने 25 हजाराचा टप्पा गाठला.
रेपो दर कपातीव्यतिरिक्त, आरबीआय एमपीसी बैठकीत घेतलेल्या काही इतर मोठ्या निर्णयांचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. रेपो दर कपातीसह, केंद्रीय बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) 100बेसिस पॉइंट्सने 4 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर कपातीचा निर्णय आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी एक पाऊल म्हणून वर्णन केला आहे. हिंदुस्थान गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. देशाचा परकीय चलनसाठाही सतत वाढत आहे आणि तो सध्या 691.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तसेच आरबीआयने आर्थिक वर्ष 26 साठी महागाई दराचा अंदाज 4 टक्क्यांवरून 3.7टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहे.