
उपचारादरम्यान रुग्णांचे काही कमी जास्त झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टरांवर, कर्मचाऱयांवर अनेकदा हल्ले होतात. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली. आपल्याला डॉक्टरांचे संरक्षण करायलाच हवे, सध्याच्या काळात ते प्रचंड काम करत आहेत, जर आपण त्यांचे संरक्षण करू शकलो नाही तर आपण आपल्या कामात कमी पडत आहोत, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींनी सरकारला सुनावले.
डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात जास्त घडल्या असून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करत डॉ. राजीव जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकार अशा घटनांना आळा घालण्यासाठी 2010च्या कायद्यासह इतर कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, सध्या डॉक्टर्स चोवीस तास काम करत आहेत. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे त्यामुळे शासनाने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला दुसऱया खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या व सुनावणी पुढील आठवडय़ापर्यंत तहकूब केली.

























































