ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावातील बेसुमार पाणीउपसा थांबवा; प्राणिमित्रांसह मच्छीमारांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा, सांगली आणि सोलापूर जिह्याच्या सीमारेषेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. म्हसवड मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असणाऱया राजेवाडी तलावात आज फक्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राजेवाडी, हिंगणी, पळसावडे येथील शेतीसाठी 300 ते 400 विद्युत मोटारींतून रात्रंदिवस पाणी उपसा सुरू आहे. या पाणी उपशामुळे वन्यप्राणी, पाळीव जनावरे तसेच मत्स्यबीजांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, विद्युत मोटारीने होणारा पाणी उपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी प्राणिमित्रांसह मच्छिमारांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

राजेवाडी तलावाची भिंत सोलापूर जिह्यात येत असली, तरी पाणी साठवण भाग हा सातारा जिह्यात येतो. तलावानजीक पिलीव घाट डोंगररांग आहे, तर पळसावडेनजीक काळा ओढा या दोन्ही परिसरात हरीण, कोल्हे, लांडगे, तरस, सायाळ अशा विविध वन्यप्राणी तसेच पशू, पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. वन्यप्राणी रात्री तलावातील पाणी पिण्यासाठी येत असतात. या ठिकाणी मेंढपाळ जनावरे घेऊन येतात. त्यामुळे तलावातील मृतसाठा आटला तर काय करायचे, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर देवापूर मच्छीमार व्यावसायिक सहकारी सोसायटी अंतर्गत 175 मच्छीमार व्यावसायिकांच्या तलावातील पाणी उपशामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या पुढे मत्स्यबीज टिकवण्याचे मोठे आवाहन आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विद्युत मोटरीने पाणी उपसा थांबवण्याचे आदेश देऊनही पाणी उपसा सुरूच असल्याचे देवापूर मच्छीमार सोसायटीने तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदरचा तलाव हा 1876 मध्ये ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी बांधला होता. याची साठवण क्षमता 1.692 टीएमसी असून, या तलावामुळे 44 हजार 208 एकर क्षेत्राला लाभ होतो. तलाव भरल्यानंतर 480चौरस मैल पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीच पाणी असते.