
काशिराम गायकवाड । कुडाळ
कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात शुक्रवारी रात्रीपासून ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळला. कर्ली नदीला पूर येऊन आंबेरी पुलावर पाणी आल्याने शनिवारी सकाळी सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे माणगांव खोऱ्यातील सुमारे ३० गावांचा संपर्क तुटला होता. दुकानवाड, शिवापूर, वसोली येथील पुलांवरही पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूकडे एस.टी.सह खाजगी वाहने अडकून पडल्यामुळे शाळकरी मुलांसह ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. वीज, दूरध्वनी व वाहतूक सेवा विस्कळीत झाली परिणामी जनजीवन विस्कळीत झाले.
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला असतानाच शुक्रवारी रात्री पासून माणगांव खोऱ्यातील सह्यपट्ट्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. रात्रभर ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळला. परिणामी माणगांव खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांना पूर आल्याने नद्या ओसंडून वाहत होत्या. कर्ली नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कर्ली नदीच्या पुराचे पाणी आंबेरी पुलावर पाणी आल्याने शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून या भागातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. त्यामुळे माणगांव खोऱ्यातील सुमारे तीस गावांचा चार तास संपर्क तूटला होता. शिवाय दुकानवाड, वसोली, शिवापूर भागातील पुलांवरही पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली.
आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगांवसह आंबेरी, दुकानवाड, वसोली, उपवडे, शिवापूर, नानेली आदींसह सुमारे तीस गावांचा संपर्क तुटला होता. सकाळी दहा वाजताच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरल्यावर चार तासांनी ठप्प झालेली वाहतूक सुरू झाली. दरम्यान शिवापूर, दूकानवाड, वसोली, नानेली भागातून वस्तीच्या येणाऱ्या एसटी बससह खाजगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली होती. परिणामी शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली. अतिवृष्टीमुळे पडझडीच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. वीज, दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली. घोडगे मळेवाडी येथे एका घराचे पत्रे उडून नुकसान झाले. तालुक्यात गेल्या चौवीस तासात २४ मि.मि. तर एकूण २०१४ मि.मि. एवढी नोंद कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयातील आपत्ती कक्षात करण्यात आली आहे. शनिवारी तालुक्यात अन्य भागात तुरळक प्रमाणात पाऊस कोसळला. माणगांव खोऱ्यात कोसळलेल्या धो धो पावसाने भंगसाळ नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.
आपत्कालीन कक्ष बेदखल
कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शिवाय मोठा गाजावाजा करून कुडाळ पंचायत समिती प्रशासनाने सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन कक्ष यावर्षी पासून स्थापन करण्यात आला आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे घडत असलेल्या विविध घटना, नुकसानी यांच्या किरकोळ नोंदी होत असतात. मात्र माणगांव खोऱ्यात झालेला ढगफुटीसारखा पाऊस व आंबेरी पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील चार तास ठप्प झालेली वाहतूक याची नोंद शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही कक्षात झालेली नव्हती.































































