लोन ऍप्सचे धागेदोरे चीनपर्यंत, अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर 

कर्जवसुलीच्या नावाखाली बदनामी करणाऱ्या बापलेकाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. मोहम्मद सरताज आलम यासीन आणि शोएब इक्बाल आलम अशी त्या दोघांची नावे आहेत. हे ठगांना दोघे बँक खाते पुरवण्याचे काम करायचे. लोन ऍप्सचे धागेदोरे हे चीनपर्यंत पसरल्याचे तपासात समोर आले आहे.

कल्याण येथे राहणाऱ्या महिलेची कर्ज न फेडल्याने तिची बदनामी करण्यात आली होती. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक सचिन कांबळे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सरताज आणि शोएबची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथून त्या दोघांना अटक केली.

अशी करायचे फसवणूक

काही ऍप्स जे प्ले स्टोअर्सवर नाही अशा ऍप्सची जाहिरात ते ट्रू कॉलर किंवा अन्य साइटवर द्यायचे. त्या साइटवर जाहिरात दिल्यावर ती टोळी त्या व्यक्तींना फोन करायची. एका तासात ही टोळी एक हजार ते एक लाख रुपये लोन मंजूर करून द्यायची. लोन मंजूर करताना नागरिकाचे कोणतेही कागदपत्रे, केवायसी आणि सिव्हिल स्कोअर तपासात नसायचे. फक्त डेटा कॉण्टॅक्टचा ऍक्सेस मिळाला की लोन मंजूर करायचे. कर्ज फेडण्याची तारीखदेखील हीच टोळी ठरवत असायची. दंड, विविध कर असल्याचे सांगून जबरदस्तीने कर्जवसुली केली जायची.

– फसवणुकीसाठी या टोळीने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. पोलिसांना टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये आरोपीचे चिनी भाषेत झालेले संभाषण आढळले आहे.

– फॅशन डिझायनर असलेला सरताज हा काही वर्षे चीनमध्ये राहिला होता. त्यानंतर झटपट पैशासाठी तो लोनच्या नावाखाली फसवणूक करू लागला. नागरिकांच्या बँक खात्याचे ऍक्सेस स्वतःकडे घेऊन ओटीपीच्या आधारे पैसे काढत होता. तसेच त्या अकाऊंटचा दुसरा ऍक्सेस हा चीनमधील काहींना होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. फसवणुकीसाठी त्याला दिवसाला तीन हजार रुपये कमिशनदेखील मिळत होते.