
सांगली महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरणासारख्या उपाययोजना करण्यात येत असतानाही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, ही संख्या आता 17 हजारांच्या आसपास गेली आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 5400 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मनपाच्या वतीने वर्षाला दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण होते.
महापालिका क्षेत्रात 2016मध्ये साधारण 13 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणिमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला विविध उपाययोजना करण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या. मात्र, तशा उपाययोजना झाल्या नाहीत. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलाचा बळी जाण्याचा प्रकारदेखील शहरात घडला होता, तर अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. सन 2018 मध्ये स्थायी समितीचे तत्कालीन सभापती अजिंक्य पाटील यांनी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एजन्सी नेमण्यात आली. मात्र, एजन्सीचे काम समाधानकारक न झाल्याने महापालिकेने एका पशुवैद्यकीय अधिकाऱयाची नेमणूक करून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे.
निर्बीजीकरण करण्यापूर्वी कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देणे आवश्यक असते. मात्र, इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग मंदावत आहे. दररोज साधारण चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांची एकूण संख्या पाहता ते काम तितक्या प्रभावीपणे होत नाही. याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱयांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून त्रास होतो. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने अपघात होतात. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत.
शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. कुत्रे चावल्यामुळे रेबीज होण्याची भीती आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 5 हजार 400 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामुळे कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे. महापालिका प्रशासनाने भटकी कुत्री पकडण्यासाठी डॉग व्हॅनची खरेदी केली होती. मात्र, अनेक भटकी कुत्री डॉग व्हॅनच्या वासाने लांब पळतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर आता ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
दररोज सरासरी चार कुत्र्यांचे निर्बीजीकरण…
भटक्या कुत्र्यांची एक मादी चार पिलांना जन्म देते, त्यामुळे महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी चार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण महापालिकेकडून करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवली जाते. वर्षाला 1500 ते 1600 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाते.
चिकन-65चे स्टॉल, चिकन, मटण सेंटरला हवे निर्बंध
भटकी कुत्री साधारणपणे शहरातील चिकन, मटण शॉपसह चिकन-65च्या स्टॉल परिसरात मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. चिकनचे पडलले वेस्ट मांस खाऊन भटकी कुत्री आक्रमक बनतात. अशा ठिकाणी पूर्वी मनपा प्रशासनाने चिकन-65च्या दुकानदारांना वेस्ट कचरा टाकण्यासाठी बकेट ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही महिने दुकानदारांनी मनपाच्या सूचनांचे पालन केले. मात्र, आता बकेट नसल्याचे दिसून येत आहे.


























































